स्थान: कोझिकोड शहरापासून साधारण 16 किमी.
कोझिकोडच्या लोकांसाठी, सुंदर खडकांनी वेढलेला बीच म्हणजे, कप्पक्कडवू. पर्यटकांसाठी हा केरळमधील सर्वात सुंदर किनाऱ्यांपैकी एक आहे. काप्पाडचा उल्लेख इतिहास व भुगोलासंबंधित ग्रंथांमध्ये मलबार प्रदेशाचे प्रवेशद्वार म्हणून केला आहे. येथे, 501 वर्षांपूर्वी, वास्को द गामा (1460-1524) या पोर्तुगीज खलाशाने 170 माणसांसह केरळमध्ये पाऊल ठेवले होते व इतिहासातील नव्या पर्वाचा आरंभ झाला होता, भारत व युरोप मधील दीर्घकालीन, संघर्षात्मक सामाजिक-राजकीय संबंधांचे पर्व.
मलबारमधील मसाले आणि संपत्तीने प्रथम अरबांना, फिनिशियन्सना, ग्रीकांना, रोमनांना, पोर्तुगीजांना, डचांना, इंग्रजांना केरळात आणले. काप्पाडने असे अनेक प्रवेश पाहिले आहेत. कोझिकोड हे मलबार प्रदेशातील सर्वात महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. या शक्तिशाली प्रदेशावर राज्य करणारे जोमोरीनही शक्तिमान आणि क्रूर होते. जरी पोर्तुगीजांचे कोझिकोडमध्ये स्वागत झाले तरी जोमोरिनांनी खूप काळ त्यांना प्रोत्साहन दिले नाही, म्हणूनच त्यांनी आपला तळ कोची व कोल्लमकडे दक्षिण दिशेला हलविला.
आज, काप्पड बीचवर एक लहान दगडी स्मारक आहे जे या ऐतिहासिक महत्त्वाचे निदर्शक आहे. जवळच्या खडकांवर एक मंदीर आहे जे 800 वर्षे जुने आहे असे मानले जाते.
पर्यटकांसाठी हे समुद्रकिनाऱ्यावरचे लहानचे शहर नंदनवन आहे. काप्पाडकडे जायचा उत्तम मार्ग म्हणजे बॅकवॉटर्समधून आहे. कोझिकोडचे विशुद्ध आणि निर्जन आणि सुंदर बॅकवॉटर एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे. कोरपुझ्झा नदीच्या बॅकवॉटर्समधून जात तुम्ही या बीचवर पोहोचता.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेल्वे स्थानक: कोझिकोड, साधारण 16 किमी
- जवळचा विमानतळ: करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोड, कोझिकोड शहरापासून साधारण 23 किमी