जीवनातील काही सुंदर गोष्टींसाठी किंमत मोजावी लागते. आणि या महिन्यात आम्ही तुम्हाला केरळच्या वायनाड जिल्ह्यातील काही रमणीय ठिकाणे पहायला नेणार आहोत. तुमच्या पायांना हे थोडे आव्हानच आहे. येथे जाण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळ्यानंतर लगेच म्हणजे जून/ जुलै मध्ये. आतापर्यंत तुम्हाला आम्ही काय दाखवणार आहोत याचा अंदाज आलाच असेल. होय, पाण्याशी संबंधित काहीतरी आहे. पण हे नुसते पाणी नाही तर ही एक आकाशगंगा आहे जी वायनाड जंगलाच्या घनदाट वृक्षराजींमधून वाहते. मीनमुट्टी धबधबा, जो डोंगरावरून खाली येऊन वाहतो त्याला वायनाडमधील वडुवन्चाल जवळील नीलिमला पॉईंटवरून पाहणे हे एक मंत्रमुग्ध करणारे दृश्य असते.
वायनाड जिल्ह्यातील कल्पेट्टा पासून प्रथम चंडेल येथे पोहोचा आणि ऊटी रस्त्यावरून उजवीकडे वळा जो रस्ता तुम्हाला मेप्पडी वरून वडुवन्चाल ला नेतो. तेथे पोहोचल्यावर उजवीकडे वळा. येथून नीलिमलाला पोहोचण्यासाठी चारचाकी गाडी भाड्याने घेणे उत्तम. वडुवन्चालनंतर 3 किमी पुढे गेल्यावर रस्ता उजवीकडे वळतो आणि एका खडबडीत रस्त्यावरून जात एका आदिवासी पाड्याच्या तळाशी पोहोचतो, सभोवताली दिसतील कॉफीचे मळे आणि काळ्या मिरीची लागवड. उतरून आपले सामान उचला, ट्रेकिंगचे बूट घाला आणि एक चांगला कॅमेरा विसरू नका.
नीलिमला पॉईंटकडे जाताना, तुम्हाला दोन्ही बाजूंना आणि वर दिसतील कॉफीचे मळे, आल्याची रोपे आणि सुपाऱ्यांचे घोस. पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गाच्या दोन्ही बाजूला असतील जांभळ्या फुलांची झुडपं आणि चिवचिवणारे सूर्यपक्षी आणि झुडपांमध्ये बागडणारे अन्य लहान पक्षी.
चढाचा पहिला अर्धा किलोमीटरचा भाग संपल्यावर, मार्ग अधिकच अरुंद होत जातो आणि पुढच्या चढाच्या आधी थोडा उतार येतो. आता दोन्ही बाजूला उंच, जंगली गवत असेल ज्यात गवती चहाचे अनेक प्रकार आसतील. अरुंद रस्ता आणखी वर जाऊन अचानक एक सुंदर दृश्य नजरेसमोर येते, पश्चिम घाटाच्या रांगा डाव्या बाजूला. आणि गवताने आणि कड्यांनी सजलेला उतार उजव्या बाजूला. तुम्ही नीलिमला पॉईंटला पोहोचला आहात.
थोडे थांबा. श्वास भरून घ्या. थंड वारा केसांत भरून घाम जिरवा. भोवती दिसतील वेगळ्याच रंगा आणि आकारांची फुलपाखरं उतारावरून खाली येताना किंवा धुक्यात हरवताना. इथे थोडा वेळ थांबल्यावर तुम्हाला ऐकू येईल दरीतील मंद आवाज. तो ऐकतानाच डावीकडचा खाली जाणारा रस्ता धरा. तुमच्या अंगावर झुकणाऱ्या उंच गवतातून मार्ग काढा. जपून जा आणि निसरडे दगड आणि खड्डे पहात जा. डाव्या दिशेने जात, मार्ग तुम्हाला अशा ठिकाणी नेईल जेथे तुम्ही पर्वताच्या मागच्या बाजूला असाल आणि जिथून दऱ्यांचा आवाज दुप्पटीने ऐकू येईल.
आता काळजीपूर्वक खाली उतरा आणि खडकाळ भागाच्या मध्यभागी जा. तुमच्या समोर दिसणाऱ्या दृश्यावर काही क्षण तुमचा विश्वास बसणार नाही. तेथून खाली कोसळत असेल शुभ्र पानी हिरव्यागार वनाकडे. असे दृश्य जे तुम्ही कधीही विसरणार नाही. उत्तम फोटो काढा आणि हे सौंदर्य जेवढे साठवता येईल तेवढे साठवून घ्या. मीनमुट्टी धबधब्याचे दृश्य पाहताना काही वेळा धुक्याचा पडदा तुमची दृष्टी अडवेल. पण वैतागू नका. काही काळ थांबा, धुके जाईल आणि धबधबा पुन्हा दिसू लागेल, जो आणखी एक आनंददायी अनुभव असेल.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेल्वे स्थानक: कोझिकोड, वडुवन्चाल पासून साधारण 80 किमी
- जवळचा विमानतळ: करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, वडुवन्चाल पासून साधारण 95 किमी.