पक्षीपातालम, वायनाड
स्थान: थिरुनेल्लीहून 7कि.मी उत्तरेला, मानंतवाडीहून सुमारे 32कि.मी. व कालपेट्टाहून सुमारे 66 कि.मी., वायनाड जिल्हा, उत्तर केरळ.
उंची: समुद्रापाटीपासून सुमारे 1740 मी.
वायनाड हा उत्तर केरळमधील डोंगराळ जिल्हा, आर्द्र पानझडी वृक्षांनी व्यापलेला आहे. येथे हत्ती, वाघ, चित्ते, जंगली मांजरी, सिवेट्स, रानगवे, मोर, तसेच पक्ष्यांच्या अनेक जाती आढळून येतात. अशा या निसर्गरम्य व एकांत ठिकाणी, समुद्रसपाटीपासून सुमारे 1740 मी. उंचीवर, पक्षीपातालम हे अतिशय छोटेसे, रम्य व शांत ठिकाण वसले आहे.
या ठिकाणाचे ‘पक्षीपातालम’ हे नावच येथील विपुल पक्षीजीवनाची कल्पना देते. येथील निबीड वने, वाहणारे ओढे, व उभेच्या उभे डोंगरउतार यांच्यामुळे गिर्यारोहणासाठी आव्हान देणारी भौगोलिक स्थिती निर्माण झाली आहे. प्राचीन काळी येथे ऋषींनी तपश्चर्या केली अशी ख्याती असणाऱ्या येथील गुहा हे पर्यटकांसाठी मोठेच आकर्षण ठरत आहे.
येथूनच जवळ असणारे कुरुवाद्वीप हे तेथील दुर्मिळ वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. मानंतवाडीपासून सुमारे 17 कि.मी.दूर असणाऱ्या या ठिकाणी कबानी नदीच्या तीरांवर सुमारे 950 एकर क्षेत्रावर सदाहरित वने पसरली असून, ही वने म्हणजे अनेक दुर्मिळ पक्षी, ऑर्किड्स व वनस्पतींचे माहेरघर मानले जाते.
येथे पोहोचण्यासाठी:
पक्षीपातालम हे थिरुनेल्लीहून 7कि.मीवर असून गिर्यारोहण हा या ठिकाणी पोचण्याचा एकमेव मार्ग आहे. थिरुनेल्ली हे मानंतवाडीहून 32कि.मी. अंतरावर आहे.
- जवळचे रेल्वेस्थानक: कोझिकोडे, मानंतवाडीहून सुमारे 106 कि.मी..
- जवळचा विमानतळ: कारीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोडे, कोझिकोडे शहरापासून सुमारे 23कि.मी.